अंबाजोगाई :-शहरातून बीड कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील टायरच्या दुकानाचे शटर उचकून चोरट्यांनी तब्बल 23 लाख 83 हजार रुपयांचे टायर आणि ट्यूब चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रोजी सकाळी उघडकीस आली.या मोठ्या चोरीने शहरात खळबळ उडाली असून,अद्याप चोरट्यांचा कसलाही सुगावा लागलेला नाही.
अंबाजोगाई बीड रोडवर आर्यवीर मंगल कार्यालयाच्या समोर प्रवीण बाळासाहेब करपे (रा.जवळबन,ता.केज)हे गुरुवारी दिवसभराचे काम आटोपून रात्रीच्या वेळी दुकान बंद करून ते गावाकडे निघून गेले. त्यानंतर चोरट्यांनी रात्रीतून कधीतरी दुकानाचे शटर टामीच्या साह्याने तोडून उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील 652 टायर आणि ट्यूब व 1780 स्वतंत्र ट्यूब असा एकूण 23 लाख 83 हजार 619 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास प्रवीण करपे यांना त्यांचे दुकान फोडल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी प्रवीण करपे यांच्या अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनेराव बोडखे हे करत आहेत.