प्रगतिशील लेखक संघ राज्य अधिवेशन टेंभुर्णीच्या अध्यक्षपदी चित्रकार- कवी भ.मा. परसवाळे

0
215

टेंभुर्णी प्रतिनिधी

चिंतनशील प्रवृत्तीचे, प्रसिद्धी परान्मुख, हाडाचे शिक्षक असणारे भ.मा. परसवाळे यांच्या अध्यक्षीय मनोगताची सर्वत्र उत्सुकता आहे. मराठवाड्याचे भूमिपुत्र असणारे भ.मा. परसवाळे यांचा १९६७ पासून काव्य लेखन आणि रेखाटने करण्याचा अव्याहत प्रवास आजही ८० व्या वर्षापर्यंत अखंड सुरू आहे. प्रगतिशील भूमिका असणाऱ्या या कवी चित्रकाराचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ‘आरोह’ कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त आहे. त्याचबरोबर ‘रस्ते दुभंगत आहेत’ या त्यांच्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘केशवसुत पुरस्कार’ प्राप्त आहे. कल्पतरू पुरस्कार, शिवार पुरस्कार, विनायकराव चारठाणकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, मराठी साहित्य संघाचा बा.ग. ढवळे पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, गोविंद पुरस्कार, अस्मितादर्श पुरस्कार, अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.
‘एकत्रित’ या त्यांच्या नव्या- जुन्या कवितासंग्रहाचे संकलन मुंबईच्या मुक्तशब्द प्रकाशनाच्या वतीने करण्यात आले आहे.
साहित्य अकादमीच्या वतीने प्रकाशित ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ या पुस्तकात त्यांच्या मौलिक अशा कवितांचा अंतर्भाव देखील करण्यात आलेला आहे. सामाजिक जाणिवांच्या कार्यक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी होत असतात. परसवाळे हे स्टेट आर्ट कौन्सिल मुंबई येथे दहा वर्षे सदस्य होते. त्याचबरोबर ‘लोकसत्ता मराठवाडा वृत्तांत’ मधून ललित कलांवर त्यांनी लेखन केलेले आहे. साहित्य अकादमीच्या मुखपत्र असलेल्या अंकांचे चित्र सज्जा त्यांनी त्यांच्या प्रतिभा संपन्न हाताने केलेली आहे. त्याचप्रमाणे मराठीतील मौज, पाप्युलर, लोकवाङ्मय, कॉन्टिनेन्टल, देशमुख अँड कंपनी तसेच साहित्य संस्कृती मंडळ यांच्या विविध मासिके, त्रैमासिक आणि ग्रंथ तसेच विविध ललित साहित्यप्रकारांचे त्यांनी मुखपृष्ठ रंगवलेली आहेत. ही मुखपृष्ठे विविध स्तरावर गाजली आणि समीक्षकांनी पसंत केली आहेत.
हिंदीमधील वाणी प्रकाशन दिल्ली सारख्या प्रतिष्ठेच्या प्रकाशन संस्थेत त्यांनी मुखपृष्ठ काढली आहेत. संस्कृती प्रकाशन, संगत प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन इत्यादींसह मराठीतील सर्वच प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ त्यांनी केलेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद त्याचप्रमाणे स्वात रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड इत्यादींच्या संग्रही असणाऱ्या ऑइल पेंटिंग्स त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या आहेत. मराठवाडा मौज, हंस, चौफेर, धनंजय, सृजन, अंतर्नाद, इत्यादी दिवाळी अंकांची सजावट परसवाळे करत असायचे. म्हणून त्या -त्या काळात ही दिवाळी अंके अत्यंत उल्लेखनीय आणि दखलपात्र झालेली आहेत. साहित्य अकादमीच्या वतीने मुंबई, कोल्हापूर व औरंगाबाद येथे व्याख्यान त्यांनी दिलेली आहेत.
पुणे, अजिंठा येथे मूर्त व अमूर्त कलांवरील त्यांचे विचार प्रवण करणारी व्याख्यानेही अत्यंत महत्त्वाचा ठेवा समजला जातो. ऑनलाइन चित्रकला व अन्य ललित कला यावर देखील त्यांच्या मुलाखती नवीन विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरलेल्या आहेत. प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य अधिवेशन अध्यक्षपदी त्यांच्या या निवडीमुळे साहित्य व सांस्कृतिक वर्तुळातून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here