थोर स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड काशीनाथराव जाधव

0
431

दि.७ मे, २०२३ हा थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. काशीनाथराव जाधव यांचा स्मृतिदिन… त्यांच्या कार्यावर श्री गोविंदराव शेळके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, गेवराई यांचा हा लेख
“कॉम्रेड काशीनाथराव जाधव”…

आकाशात रात्रीच्या वेळी अगणित तारे अविरतपणे चमकत असतात. अशा विलोभनीय चमकणाऱ्या ताऱ्यांमधून काही तारेच आपले लक्ष वेधून घेतात आणि आपण पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पहात राहतो. एक सात्विक आनंद ते देत राहतात. अशाच प्रकारे कॉम्रेड काशीनाथराव जाधव यांची आठवण झाली असता सात्विक आनंद होतो व त्यांच्या अफाट कर्तुत्वापुढे नतमस्तक व्हावे वाटते.
 कॉम्रेड काशीनाथराव तात्याबा जाधव यांचा जन्म 1920 साली मराठवाड्यातील पिंपळनेर ता.जि. बीड येथे एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच झाले. डोंगरे गुरुजींच्या विनंतीवरून काशीनाथराव जाधव यांना पुढील शिक्षणासाठी बीडला पाठविण्यात आले.  त्यांना फोकानीयाच्या शाळेत प्रवेश देण्यात आला, पण त्यांचे शिक्षण अत्यंत कमी म्हणजेच जेमतेम इयत्ता नववी पर्यंत झाले असे आमच्या ऐकण्यात होते. स्वराज्य चळवळीतील काही लोकांनी दत्त मंदिर गल्लीत व्यायाम शाळा सुरू केली होती. काशीनाथराव जाधव तेथे जाऊ लागले व व्यायामासाठी लाठी चालविणे, तलवार, भालाफेक इत्यादीचे धडे त्यांनी घेतले. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण आपण म्हणजे मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता. आपल्यावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. या राज्याचा मुख्य पुरुष निजाम उलमुलख याने 1723 ला प्रथम राज्य स्थापन केले. एकूण सात निजाम झाले. शेवटचा निजाम उस्मान आली का बहादूर होता. हैदराबाद राज्यात खालील भाग होते. मराठवाडा - पाच जिल्हे, (आंध्र प्रदेश) तेलंगणा - आठ जिल्हे, कर्नाटक -तीन जिल्हे, असा एकूण 16 जिल्ह्यांचा निजामाचा प्रदेश होता. त्यांचे राज्य होते भारत स्वतंत्र झाला. देशातील 526 संस्थाने संघराज्यात सामील झाली पण काश्मीरचा राजा हरिसिंग व हैदराबादचा निजाम यांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. पाकिस्तानी सैन्याने काश्मीरवर अतिक्रमण केले. काश्मीरच्या राजाने भारताला मदत मागितली व भारतात सामील होण्याचे संमतीपत्र दिले. भारतीय फौजेने पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावले, पण हैदराबाद मात्र स्वतंत्र राज्य राहिले. निजामाने आपल्या राज्यातील जनतेवर अत्याचार, अन्याय, हिंदू सण उत्सवावर बंदी घातली, लोकांची मुस्कटदाबी केली. याचा परिणाम म्हणून राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी त्याला जबर विरोध केला. त्यात आपला जिल्हाही मागे राहिला नाही. संघर्ष पर्वात आघाडीवर असणारे कॉम्रेड काशीनाथराव जाधव यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचे कार्यक्षेत्र जवळपास मराठवाडा असे होते. गुप्त पत्रके काढणे, सत्याग्रह करणे, सत्याग्रह करण्यासाठी तुकडी पाठवणे, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशनवर हल्ला करणे, करोडगिरी नाके  लुटणे, इत्यादीसाठी  शेतकऱ्यावर अन्याया विरोधात टाकळगावातील महिला व गावकऱ्यांनी लढत दिली. पुढे स्टेट काँग्रेसवर बंदी आणली. हेच काम महाराष्ट्र परिषदेद्वारे सुरू झाले. महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन तालुका पातळीवर गेवराई येथे झाले. ही जबाबदारी श्री काशीनाथराव जाधव व तु.ना.भोले यांच्यावर टाकण्यात आली. काशीनाथराव जाधव यांनी परिश्रम घेऊन अधिवेशन यशस्वी केले. त्यांच्या विनंतीवरून जिल्हा अधिवेशन पिंपळनेर तालुका बीड या ठिकाणी घेण्याचे ठरले. अध्यक्ष रामलिंग स्वामी निश्चित झाले. या अधिवेशनाला  1000 शेतकरी जमा झाले. तेथील स्थानिक शेठजीने भोजनाची व्यवस्था मोफत केली. हे अधिवेशन यशस्वी झाले. काशीनाथराव जाधवांनी सर्वांचे आभार मानले. काशीनाथराव जाधव यांच्यावर निजामाच्या पोलिसांची करडी नजर होती. त्यामुळे काशीनाथराव जाधव वेषांतर करून शेतकरीदादा म्हणून भूमिगत राहून कार्य करू लागले. 
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरीदादा यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. लातूर अधिवेशनासाठी काशीनाथराव जाधव यांनी 1000 शेतकरी पायी दर कोस दर मुकाम करीत लातूरला नेले. त्यांच्या सभेला खूप लोक जमत असत, ते गाणे व पोवाडे म्हणत असत. “स्वराज्य मिळवायचं औंदा ग,  म्हणून कारभारणी सोडलाय धंदा..” त्यांच्या सभेला महिलाही खूप जमत असत. त्यावेळी ते ओव्या म्हणून दाखवीत, “ गांधी माझा सखा ग, ओवी त्यांना गाईन, तुरुंगात जाईन..., स्वराज्य मिळविणे...” या संघर्षपर्वातील स्टेट लेवलचे त्यांचे नेते स्वामी रामानंदतीर्थ, दिगंबर बिंदू, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ. जिल्हा पातळीवरील त्यांचे सहकारी पु.ना.चपळगावकर, रामलिंग स्वामी, वामनराव वझे, नारायणराव जुजगर इत्यादी. कासम रझवी या लातूरच्या वकिलाने ‘रझाकार’ नावाची जातीय संघटना स्थापन केली. त्या संघटनेद्वारा हैदराबाद राज्यातील जनतेवर अतोनात अत्याचार केले. लोकांना खंडणी मागणे, लोकांची चांगली जनावरे, घोडे, बळजबरीने घेऊन जाणे, लोकांकडून धान्य वसूल करणे, इत्यादी. 
 भारत सरकारच्या गृहखात्याने निजामाला समजूत दिली, पण फार फरक पडला नाही. शेवटी 14 सप्टेंबर, 1948 रोजी भारतीय फौजेने चहूबाजूने हैदराबादच्या दिशेने आगेकूच केली. निजामाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. 17 सप्टेंबर, 1948 ला हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले. 17 सप्टेंबर, 1948 ला लोकांनी झेंडावंदन केले. मिरवणुका काढल्या, आनंद व्यक्त केला. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. आता निवडणुका आल्या आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी लोक निरनिराळ्या पक्षात सहभागी होऊ लागले. विविध पक्षांचे झेंडे लावून निवडणुका लढवू लागले. स्वातंत्र्यसैनिक हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्यांना लाचारी जमली नाही. कोणाचेही लांगूनचालन करता आले नाही. त्यामुळे बरेच स्वातंत्र्यसैनिक हाताश होऊन आपल्या घरी बसले, तर काही लोक विधायक कार्याकडे वळले. त्यापैकी एक म्हणजे काशीनाथराव जाधव यांनी विद्यार्थी वस्तीग्रह सुरू केले. प्रथम त्यांनी 1949 झाली वस्तीग्रहाची स्थापना केली. हे वसतिगृह प्रथम जुन्या बाजारातील खाजामिया वकिलाच्या वाड्यात ‘हिंद वस्तीग्रह’ या नावाने सुरू झाले. काशीनाथराव जाधव यावेळी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. आणि वस्तीग्रहाचा कारभारही काँग्रेस कार्यकर्त्याकडे दिला. हिरामणसेठ नावाचे एक व्यापारी होते ते रामतीर्थ मंदिराचे ट्रस्टी होते. त्यांच्याकडून काशीनाथराव जाधवांनी हे शिवकालीन मंदिर घेतले. गावापासून दूर बिंदूसरा नदीच्या काठी हे मंदिर होते. त्यात चार-पाच खोल्या होत्या. त्यामध्ये विद्यार्थी राहून अभ्यास करू लागले. इथेच ‘जनता विद्यार्थी वस्तीगृहा’चा  प्रारंभ झाला. खाली बिंदुसरा वाहते व मंदिरात विद्यार्थी आपले भावीजीवन घडवीत होते. जवळच स्मशानभूमी होती, कधी प्रेत जळत असत आणि मुले चिमणीवर अभ्यास करत असत. “संत वाहते कृष्णामाई I काठावरल्या सुख-दुःखाची जाणीव तिजला नाही II” अशा प्रकारे बिंदुसरेला या दोन्ही बाबीचे काहीच देणेघेणे नव्हते. या उदास वातावरणात विद्यार्थी रमत नसल्यामुळे बीडमधील खडकपुऱ्यातील धनगर गल्लीतील पुन्हा एका मोठ्या मठात जागा मिळाली. त्या जागेला शंकरबुवाचा मठ असे म्हणत. या ठिकाणी हे वसतिगृह अडीच तपे म्हणजे 30 वर्षे चालले. 
आमच्या वेळेला विद्यार्थ्यांना दळण दळून आणणे, भाजीपाला आणणे इत्यादी कामे असत. बोर्डिंगमध्ये त्या वेळेला चार-पाच रांजण असत. काळ म्हणजे 1961 ते 1966 चा. आम्ही सर्व विद्यार्थी त्यात पाणी पीत असत. सर्व जातीची मुले वस्तीगृहात असत. उदाहरणार्थ मराठा, वंजारी, ब्राह्मण, हरिजन वगैरे अशा अठरापगड जाती होत्या. जेवताना सगळ्यांना वाढ आली की, “भारतमाता की जय”... असा निधर्मी घोष करून आम्ही सर्वजण जेवायला बसत. काशीनाथराव जाधव हे देशी खेळांचे महत्त्व मुलांना समजावून सांगत असत. आट्या-पाट्या बद्दल ते कविता म्हणून दाखवीत, “खेळा माझी खेळ आट्या-पाट्या I व्यायाम देण्यास तयार मोठ्या I सर्व गड्यांना श्रम सारखेच, म्हनोन खेळा माझी खेळ हाच..II” बोर्डिंग मध्ये स्वच्छतेबाबत काशीनाथराव जाधव खूप काळजी घेत असत. एक मुलगा घाणेरडा राहत असे. दाढी न करणे, कपडे न धुणे, एका रविवारी सकाळी काशीनाथराव जाधव साहेब व आम्ही सगळे समाधीपाशी बसलो होतो. काशीनाथराव जाधव यांनी बळीराम जाधव व रावसाहेब नाईकवाडे यांना बोलावले. सगळ्या मुलांना उत्सुकता लागली कि, यांना कशाला बोलावले? काशीनाथराव जाधव साहेब म्हणाले कि, “ बळीराम तू या मुलाचे हात धर, रावसाहेब तू त्याचे पाय धर, हा तंगड्या झाडीन, पाय पक्के धर, त्याला कंकालेश्वरला घेऊन जा, पाण्यात बुडवायचा, फरशीवर घासायचा, असे दोन-तीन वेळा करा व फरशीवर टाका..” या वेळी खूप हशा झाला. काशीनाथराव जाधव आपल्या मुलाबद्दलही विनोद सांगत असत. (डॉ राधाकृष्ण जाधव यांची क्षमा मागून) काशीनाथराव जाधव म्हणाले, आमचा डॉक्टर मुलगा राधाकृष्ण याने लग्नासाठी 22 मुली बघितल्या, त्याला एकही पसंत पडली नाही. गड्याचे वजन किती? तर कावळ्याच्या पायाला बांधले तर उडून जाईन... मुलांना मोठी गंमत वाटत असे व मुलं हसत असत... शनिवारी बहुतेक डिबेटिंग होत असे, काही मुले गाणे, नकला सादर करत असत. त्यात एका मुलाने, “कोंडू-कोंडू धरीन जीव, जीवे-भावे पूजीन..” हा अभंग मान हलवून - हलवून तो आळवू लागला, काशीनाथराव जाधव साहेब म्हणले, “अरे जीव कव्हर कोंडून धरतो, जीव जरा मोकळा सोड..” तेच तेच अभंग म्हणण्यापेक्षा ‘नवे विचार- नव्या कल्पना’ यांची गाणी म्हणा.
 ऍडव्होकेट जगन्नाथराव औटे हे मुक्याचे सोंग आणीत असत. मी स्वतः दिलेल्या विषयावर भाषण तयार करून म्हणवून दाखवत असे. त्यामुळेच मी पुढील  काळात भाषण करू लागलो. कधी कधी ऍडव्होकेट नरेंद्र चपळगावकर व डी एन कोल्हे हे आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. त्यांच्या गाजलेल्या विद्यार्थ्यांत डॉ.भोपळे बंधू, जगन्नाथराव औटे, ऍड.कुटे, ब.म.पाटोदेकर, मनोहर टाकसाळ यांना तर रशियाचे आमंत्रण होते. ते तिथे सहा महिने राहिले. तर ब.म.पाटोदेकर हे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे कुलसचिव राहिले. कुणी आजारी पडले तर जाधव स्वतःची दवाखान्यात पाठवून त्याची काळजी घेत असत. भालेकर नावाचा विद्यार्थ्याला बाहेरच्या दोन मुलांनी येऊन वस्तीगृहात हाणमार केली. त्याच्या मानेवर ब्लेडने जखमा केल्या. इतक्यात जाधव साहेब बाहेरून आले. त्यांनी चौकशी केली, मुलाने सांगितले कि, बाहेरच्या मुलाने याला हाणमार केली. जाधव साहेबांनी संतापाने प्रश्न केला कि, “तुम्ही सर्वांनी हातात बांगड्या भरल्या होत्या काय?” हे ऐकताच पाच-पन्नास मुले पेठेकडे आली व एका मुलाला धरून आणून जाधव यांच्या समोर आणून उभे केले. त्या मुलाच्या पाठोपाठ त्याचा मोठा भाऊ आला. त्याने क्षमा मागितली. समीट होऊन त्या मुलाला साहेबांनी साहेबांनी सोडून दिले.
 1952 ला बाबासाहेब परांजपे, 1967 ला नाना पाटील बीडचे खासदार झाले. यात त्यांना निवडून आणण्यात जाधवांचा सिंहाचा वाटा होता. 1962 ला काशीनाथराव जाधव हे बीडचे आमदार झाले. त्यांना निवडून आणण्यात विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा होता. निवडणुकीच्या काळात नाना पाटील वस्तीगृहात येत असत. आमच्याबरोबर जेवण करीत असत. या मोठ्या माणसाकडे मी कुतूहलाने व जिज्ञाशाने पाहत असे. नाना पाटील यांनी विद्यार्थ्यांना 1942 चा ‘चलेजाव’ चा लढा, पत्री सरकार यांची माहिती दोन वेळा सांगितली. “केलेल्या कार्याचा इतिहास जो स्वतः सांगतो, तो ऐकण्यात विशेष आनंद असतो.” तसेच शाहीर अमरशेख हे सुद्धा वस्तीगृहात येत असत. ईजार, नेहरू शर्ट, उंच ताठ केस मागे विंचरलेले, हातात फरशी कुऱ्हाड अशा प्रकारचा हा शाहीर.  अमरशेख यांचे  कलापथक ज्याला ऐकण्यास व पाहण्यास मिळाले त्यांना नशीबवान म्हणावे लागेल.  “डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती.. आल वर्ष राबवून आम्ही मराव किती.. डोंगरी शेत माझं ग... मी बेनु किती?” असे म्हणत “भलेभले”  असे मधून मधून म्हणत म्हणून त्या गीताला रंगत येत असे. 
 अशाप्रकारे काशीनाथराव जाधव यांनी सलग 35 वर्षे वस्तीग्रह चालविले. कर्मवीर भाऊराव पाटील सोडले तर, असा वस्तीग्रह चालक, ज्यांनी स्वतःच्या विद्यार्थ्यावर राष्ट्रीय व निधर्मी संस्कार केले. विद्यार्थ्यांना आई-बापाची माया दिली. अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ञ, कनवाळू व्यक्तिमत्वाचा 7 मे, 1997 ला देहांत झाला. त्यांच्याबद्दल म्हणावेसे  वाटते कि, “ती कणखर मूर्ती, धीट मराठी थाट I आदळतो जीवर अजून पश्चिम वात, ती  अजिंक्य छाती, ताठर अन रणशील I जी पाहून सागर थबके, परते आत..I”
 धन्यवाद... !
  • गो.सा.शेळके,ताकडगाव,रोड गेवराई जि.बीड मो.न.9420784530

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here