बीड, (प्रतिनिधी) – येथील नारायणा ई- टेक्नो शाळेने जागतिक नृत्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत संहिता घोक्षे हिने प्रथम पारितोषिक पटकावले आहे.
‘ वंडरगर्ल संहिता ‘ या नावाने ‘युट्युब’ वर प्रसिद्ध असलेल्या चॅनेलची बालकलावंत संहिता घोक्षे ही नारायणा ई- टेक्नो या इंग्रजी शाळेची दुसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी असून तिचे नृत्य, अभिनय, वार्तांकन असे विविध प्रकारचे असंख्य व्हिडिओ ‘ युट्युब’ वर प्रसिद्ध झालेले आहेत.
सदरील नृत्य स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघून या शाळेने ही स्पर्धा दोन फेरींमध्ये घेतली होती. आपल्या कौशल्यपूर्ण शास्त्रीय नृत्याच्या आधारे संहिता घोक्षेने प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली आणि प्रथम पारितोषिकावर आपला अधिकार सिद्ध केला.
स्पर्धेनंतर नारायणा ई- टेक्नो स्कुलच्या प्राचार्य श्रीमती प्रांजल काळे यांच्या हस्ते संहिता घोक्षे हिला प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
संहिता घोक्षे ही प्रसिद्ध अभिनेते- दिग्दर्शक- नाटककार प्रा. बापू घोक्षे आणि सौ. विजया बापू यांची सुकन्या असून प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिन्सेस डॉली घोक्षे यांची ती बहिण आहे.
बीडच्या नुपूर डान्स अकॅडमी मध्ये नृत्य गुरु श्री. राधाकृष्ण वाघ यांच्याकडे संहिता घोक्षे शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेत असून स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने ‘घुमर’ या गीतावर नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या सात वर्षे वयाच्या संहिताने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.