फळबागांचे झाले प्रचंड नुकसान
गेवराई प्रतिनिधी.
तालुक्यातील विविध भागात, शुक्रवार ता. 28 रोजी सकाळी अकरा वाजता अचानक अवकाळी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने, नदी नाल्यांना पूर आल्याचे विचित्र चित्र पहायला मिळाले असून, शेत पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाने शेतकर्यांना बेजार केले आहे. अवकाळी पावसाने शेत पिकांसह
फळबांगाच्या मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने काही भागातील झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणच्या घरावरचे पत्रे उडाले आहेत. शेतात, जनावरांसाठी बांधलेल्या गोठ्यांचे छप्पर उडाले असून, परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरूवार ता. 27 व 28 एप्रिल रोजी, सलग दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. वारा, पाऊस, विजांचा कडकडाट सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने,
गेवराई तालुक्यातील गोदाकाठ व उजवा कालव्या जवळच्या शेत परिसरात फळबांगाचे मोठे नुकसान झाले असून वाऱ्याने अंबा, पपई, मोसंबीचा सडा पडला आहे. दरम्यान, उमापूर, जातेगाव, चकलांबा, तलवडा, सिरसदेवी, पाडळसिंगी परीसरात
अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरीकांनी घराबाहेर पडू नये व काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडत असून, या पावसाने गहू, ज्वारी, बाजरी व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळबागांना आलेली फळे गारपीटीत जमीनीवर पडली आहेत. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने हिरावली आहेत. शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला असून, उभी व काढलेली पिके पाण्याने भिजली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत. नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/04/IMG-20230429-WA0030-1024x461.jpg)