थोर भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची आज जयंती. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 साली त्यांचे देहावसन झाले. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा…
महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये पहिली, 1851 मध्ये दुसरी, आणि तिसरी, मुलींची शाळा काढली.
महात्मा फुले शिक्षणाचे महत्व असलेले व स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय थोर महापुरुष होते. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून, तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.
अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत 1852 मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला बऱ्याच लोकांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत.
इ.स. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला. केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘बालहत्या प्रतिबंधगृह’ ही संस्था सुरु केली.
वयाच्या 60 व्या वर्षी जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली. डॉ. आंबेडकर हे ज्योतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणतं….
पुण्यात पहिली मराठी शाळा सन 1824 मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काढली होती.
या शाळेत गोविंदरावांनी जोतिबांना वयाच्या 7 व्या वर्षी दाखल केले. जोतिबा हे पहिले पासुनच कुशाग्र बुद्धी, कष्टाळू, प्रतिभासंपन्न असल्याने शाळेतील सर्व घटक त्यांनी आत्मसात करायला सुरूवात केली. तोंडी गणिते सोडवणे त्यांना सहज शक्य होऊ लागले. त्यांची अभ्यासातील उल्लेखनीय प्रगती पाहुन मात्र काहींचा जळफळाट झाला नसेल तर नवलच.
इंग्रज सरकारने ठिकठिकाणी शाळा उघडल्या बरोबर प्रस्थापित वर्गातील लोकांनी…
धर्म बुडाला |
कलियुग आले ||
विद्या नीच घरी गेली ||
म्हणून चोहीकडे हलकल्लोळ उडविला. ‘तुम्ही शूद्रांनी विद्या शिकल्याने सारा भ्रष्टाचार होऊन धर्म बुडेल’
असाही लोकांना उपदेश करू लागले. धार्मिक धाक दडपशाही भिऊन लोक ऐकणार नाहीत म्हणून ‘तुमच्या मुलांना शाळेत बसवून तुमचे उद्योगधंदे बुडवावे, असा इंग्रज सरकारचा डाव आहे. तुम्ही आपले उद्योगधंदे सोडून मुलांना शाळेत घालू नका’ असेही हे धर्मगुरू लोकांना सांगत सुटले आणि त्याच प्रमाणे गोविंदरावांच्या कारकुनाने व ईतर लोकांनी गोविंदरावांच्या डोक्यात भलतेच वेड भरून दिले. त्यांना सांगितले होते, की या मुलाला शाळेत घालून ऐदी बनविण्यापेक्षा बागेत काम करायला शिकवा. म्हणजे हा तुमचे कुटुंबाचे पुढे उत्तम पोषण करील अशी समजुत सरळ, भोळ्या मनाच्या गोविंदरावांची काढण्यात आली. त्यामुळे जोतिरावांच्या हातचे पाटी दफ्तर व दौत लेखणी जाऊन त्या ऐवजी हाती कुदळ खुरपे आले.
1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू..
दोन तीन वर्षांच्या अंतरानंतर गफार बेग मुन्शी आणि ख्रिश्चन मिशनरी लिजीटसाहेब यांच्या मदतीने जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. शाळेत शिकवलेले घटक घरी आल्यावर जोतीराव सावित्रीबाईंना व सगुनाबाईंना सांगुन त्यांना शिकवू लागले. अशातच त्यांच्या हाती थोर लेखक थाॅमस पेन यांचा ‘द राईट ऑफ मॅन’ हा ग्रंथ वाचनात आला. या ग्रंथाच्या वाचनाने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. निग्रो लोकांवर लादलेली गुलामी आणि त्यामुळे त्यांचे होत असलेले हाल जोतिबांच्या मनाला दुःख देऊन गेले. मानवी स्वातंत्र्याचा आणि समतेचा ध्येयवाद त्यांच्या मनात आकार घेऊ लागला. आपल्या देशातही ही स्थिती कमी-अधिक प्रमाणात असल्याचे त्यांना जाणवत होते. ज्याप्रमाणे निग्रो लोकांना वागवले जाते, त्यांचे हक्क अधिकार नाकारले जातात त्याप्रमाणे भारतातही अस्पृश्य समजलेल्या समाजाचीही तीच अवस्था आहे. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये जोर धरू लागली. खरा धर्म म्हणजे काय? या विषयी ते चिंतन करू लागले सदाचार, नैतिकता हेच खऱ्या धर्माचे सार आहे, याची जाणीव झाली. ही जाणीव आपल्या देश बांधवांमध्ये होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आपल्या बांधवांचे अज्ञान दूर करून त्यांना माणुस बनविण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी जागृत करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी स्त्रीया व शुद्र यांच्यासाठीही ज्ञानाचे दरवाजे खुले करायचे असा त्यांनी ठाम निश्चय केला. स्त्रीयांना आपल्या कर्तव्याची योग्य रीतीने जाणीव झाली तर राष्ट्राची प्रगती झपाट्याने होईल याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील बुधवार पेठेत तात्याराव भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून वर्षानुवर्षे पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधाराच्या विळख्याला मोठा छेद दिला. ही घटना म्हणजे भारताच्या शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक इतिहासातील मोठी क्रांती होय.
लेखक
सौ. उज्वला बालाजीराव गुरसुडकर