तलवाडा ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवीला चैत्र शुद्ध पौर्णिमेला तेल लागणार असून गुरूवार दि.६ एप्रिल ते गुरूवार दि.१३ एप्रिल २०२३ या कालावधीत मंदिर परिसरात नवस फेडण्यासाठी केले जाणारे कंदुरीचे कार्यक्रम बंद राहणार आहेत. गुरूवार दि.१३ एप्रिल २०२३ रोजी म्हणजे चैत्र शुद्ध अष्टमीला यात्रेस प्रारंभ होणार आहे. अष्टमीच्या दिवशी नवसाची बगाडे वाजतगाजत देवी मंदिरापर्यंत येतात व याच दिवसापासून एक महिना भरणाऱ्या यात्रेला प्रारंभ होतो. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला यात्रेस प्रारंभ होतो आणि या दिवसापासून कंदुरीचे कार्यक्रम देखील सुरू होतात. त्यामुळे दुरवरून कंदुरी घेऊन येणाऱ्या भाविकांनी गुरूवार दि.६ एप्रिल ते गुरूवार दि.१३ एप्रिल २०२३ या कालावधीत कंदुरी घेऊन कोणीही येऊ नये असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षी भव्यदिव्य असे यात्रेचे आयोजन केले जाणार असून करमणूक साधने व सर्व व्यावसायिक यांना जागा, पाणी, लाईट व संरक्षण देण्याची व्यवस्था ग्रामपंचायत, विश्वस्त मंडळ, पोलिस प्रशासन, विज वितरण कंपनी आणि तलवाडा व परिसरातील युवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. देवीचे दर्शनासाठी व यात्रेत येणारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे. तरी याची नोंद दुरवरून दर्शनासाठी येणारे भाविक, यात्रेकरू, व्यावसायिक आदींनी घ्यावी असे आवाहन देखील यात्रा उत्सव समिती, ग्रामपंचायत तलवाडा, विश्वस्त मंडळ तसेच गावातील तरूण युवकांच्या वतीने करण्यात आले आहे.