जागतिक विक्रमवीर संतोष सुरवसे यांचा पुण्यातील नारीशक्ती कडून सन्मान

0
253

पुणे ( प्रतिनिधी संजय पंडित)

दि.३0 पुणे : अवघ्या अठरा तासात तब्बल ५४० हेअर कट करून जागतिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पुण्यातील संतोष सुरवसे या सलून चालकाचा नारी शक्ती संघटनेच्या वतीने काल जाहीर सत्कार करण्यात आला.
सलून क्षेत्रातील आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढीत कर्वे नगरमधील संतोष सुरवसे यांनी ५४० हेअर कट करून सर्वोच्य विक्रमाची नोंद स्वतःच्या नावावर केली आहे.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी देखील त्याच्या या विक्रमाची दखल घेतली असून लवकरच त्याची नोंद होणार आहे.
संतोष सुरवसे यांनी अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून हे दैदिप्यमान यश मिळवल्याने नाभिक समाजासह राज्यभरातील जनतेकडून उस्फूर्तपणे त्यांचे स्वागत होत आहे.
याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या नारी शक्तीच्या वतीने जागतिक विक्रमवीर संतोष सुरवसे यांचा आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
सामाजिक कौतुक आणि समाजाकडून होणारा सन्मान अधिक प्रेरणादायी असल्याचे मनोगत यावेळी सुरवसे यांनी सत्कार स्वीकारताना व्यक्त केले.
माझ्या नाभिक समाजाचा मला नितांत आदर असून समाजाच्या सलून व्यवसायाला स्वाभिमान आणि एक वेगळी ओळख मिळविण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे सुरवसे यावेळी म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला आघाडी उपाध्यक्षा वनिताताई भालेकर,पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख विनयाताई संबेटला, वैशालीताई सुर्वे आणि नारी शक्तीच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
नारी शक्तीच्या वतीने यावेळी विक्रमवीर संतोष सुरवसे यांच्या सलून मधील त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here