निपुण बालक घडविण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन : दुशांत निमकर
गोंडपिपरी : भंगाराम तळोधी केंद्राची सहावी शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धामणगाव या ठिकाणी पार पडली.शिक्षण परिषदेचे अध्यक्ष मा.वसंत भाऊ फलके अध्यक्ष, शा.व्य.स धामणगाव तर प्रमुख मार्गदर्शक दुशांत निमकर केंद्रप्रमुख भंगाराम तळोधी उपस्थित होते तसेच मंचावर सुधाकर मडावी भंगाराम तळोधी,सुनील उईके पानोरा,नानाजी मडावी सालेझरी,तोषविनाथ झाडे पारगाव,मनोहर आंबोरकर सुपगाव,विनोद चांदेकर नंदवर्धन सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्रथमतः शिक्षण परिषदेची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दिपप्रजवलन व माल्यार्पण करण्यात आले.विद्यार्थ्यांचा भाषिक विकास साधण्यासाठी केंद्रातील प्रशांत भंडारे,अरुण झगडकर,किशोर चलाख या कविवर्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली.दुशांत निमकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षण परिषद तथा निपुण भारत अंतर्गत इयत्ता ३ री पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांस सत्र २०२६-२७ पर्यंत निपुण बालक घडविण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले तसेच पायाभूत भाषिक साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावे, असे आवाहन केले.त्यानंतर पायाभूत साक्षरता म्हणजे काय?पायाभूत संख्याज्ञान म्हणजे काय? याचे सविस्तर विवेचन केले. त्यानंतर प्रशासकीय माहिती सांगितली.
श्री.राजेश्वर अम्मावार यांनी नवोदय परिक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची करावयाची तयारी,परिक्षेतील बारकावे व विविध क्लृप्त्या याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.राजू कानकाटे यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयांतर्गत ठेवावयाचे विविध अहवाल,नोंदी,प्रकल्प याबद्दल मार्गदर्शन केले तसेच जे विद्यार्थी अध्ययनात काहीसे मागे आहेत त्यांच्यासाठी करावयाचे अध्यापन व नोंदी याबद्दल माहिती दिली.
राजू राजकोंडावार यांनी आपल्या दैनंदिन अध्यापनात वापरावयाचे विविध तंत्रज्ञान त्यांचा वापर विविध ऍप्स याबद्दल माहिती दिली.
जि.प. प्राथ. शाळा धामणगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकवृंदाच्या सहकार्याने सर्व उपस्थितांना चहा आणि स्वादिष्ट भोजन देण्यात आले.शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी फलक लेखन किशोर भोयर,सूत्रसंचालन अरुण गावतुरे,शिक्षणप्रेमी आशिष ठाकूर तसेच शाळेतील मुख्याध्यापक बंडू गंधेवार व केंद्रातील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीने,सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न झाली.