गेवराई :
गेवराई शहरांमध्ये ज्या भागांमध्ये वीजचोरीचे मोठे प्रमाण आहे अशा भागामध्ये काल दि 17 रोजी महावितरण गेवराई यांनी मोठी कारवाई केली आहे. पुढील तीन ते चार दिवसाच्या काळात अशाच प्रकारचे आकडे बहाद्दरांवर कारवाई करून भा.दं.वि. १३५ नुसार गुन्हे नोंद केले जाणार आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधींना महावितरण कडून मिळाली. सध्या अतिभारामुळे आपला विद्युत पुरवठा सकाळी वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे महावितरण विरुद्ध ग्राहकांचा रोष वाढत आहे. त्याबाबत महावितरण ला आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता त्यांनी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्यामागिल प्रमुख कारणे सांगितली, ‘सध्या हिवाळ्यामुळे प्रत्येक घरामध्ये रूम हिटर, पाण्याचे हिटर, शेगडी यांचा वापर वाढला आहे, सदर वापर सकाळच्या वेळी जास्त होत असल्याने गेवराई मधील सर्व फिडर अतिभारीत होत आहेत.’
सदर विद्युत पुरवठा खंडित न होण्यासाठी महावितरण कडून खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.१. घरावरील पाण्याच्या टाक्या सकाळी न भरता रात्रीच भरून ठेवाव्यात.२. जर आपल्या भागात पाणी आले असेल तर पाण्याची मोटार चालु करून त्याऐवजी इतर जास्त भाराची विद्युत उपकरणे बंद करावीत.उदा. पंखा, टी. व्ही., फ्रिज, इ.३. सकाळच्या वेळी आपण एखादे जास्तीचे उपकरण चालू करत असाल तर दुसरे एखादे न गरजेचे/कमी गरजेचे विद्युत उपकरण बंद ठेवावे. आपण सदर उपाययोजना अंमलात आणल्यास आपला विद्युत पुरवठा सकाळी वारंवार खंडित होणार नाही.