जिल्ह्यातले पोलीस करतायत काय?
गेवराई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात परळीतील गोळीबार, व्यापाऱ्याचे अपहरण आणि मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून झालेल्या हत्याची घटना चर्चेत असतानाच, गेवराई येथील बँकेतून घरी जाणाऱ्या शेतकरी राधाकिसन मोकिंदा कोठेकर यांच्या हातातून 1 लाख 99 हजार रुपयांची कापडी बॅग चोरट्यांनी हिसकावून पळवून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई शहरातील जुन्या बस स्थानका जवळ राष्ट्रीय महामार्गावरील बुलढाणा अर्बन बँकेची शाखा आहे. या शाखेतून राधाकिसन मुकिंदा कोठेकर आणि त्यांची पत्नी सौ शशिकला कोठेकर राहणार कोल्हेर रोड, गेवराई यांनी आपल्या खात्यातून काढलेले 1 लाख 99 हजार रुपये ची रक्कम घेऊन पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातून डॉक्टर काळे हॉस्पिटल मार्गे घराकडे निघाले होते. दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या दोन चोरट्यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांचा पाठलाग सुरू केला. श्री व सौ कोठेकर पती-पत्नी महात्मा फुले शाळे समोरील, तस्लिम किराणा समोर, मडके यांच्या घराजवळ येताच, पाठीमागून मोटर सायकलवर आलेल्या चोरट्यांनी राधाकिसन कोठेकर यांच्या हातात असलेली 1 लाख 99 हजार रुपयांची पिशवी जोरात हिसकावून पळवून नेली. हातातील रक्कम लंपास झाल्याचे कळताच कोठेकर यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे मोटर सायकलवर पसार झाले. सदर घटना दिनांक 10 डिसेंबर रोजी मध्यवस्तीत भर दिवसा 12 ते साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी वरील प्रमाणे गेवराई पोलीस ठाण्यात राधाकिसन मुकिंदा कोठेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बी एन एस 2023, कलम 309(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.