शेवटच्या आणि निर्णायक लढाई साठी
सज्ज – माजी मंत्री सुरेश नवले यांची भूमिका
समाजकारण, राजकारण आणि विधिमंडळातला प्रदीर्घ अनुभव पाठिशी असलेल्या माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांना बीड विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. राजकारणातला सर्व समावेशक स्वच्छ चेहरा म्हणून, प्रा. नवले यांची ओळख आहे. सकल समाजाच्या हिताचा विचार मांडणाऱ्या नवलेंनी लोकसभेच्या निवडणुकीत परफेक्ट भूमिका घेऊन, लक्ष वेधले. बजरंग बप्पांना प्रा. नवले यांनी पाठिंबा जाहीर करताच, डमी उमेदवार म्हणून चुकीचा मेसेज पसरवणाऱ्यांना वारं फिरल्याचा अंदाज आला होता. नवले यांनी सत्ता पक्ष सोडून समाजहिताला प्राधान्य दिल्याची नोंद झाली.
नवले यांना, २०२४ च्या बीड विधानसभेच्या रणांगणात शेवटची, आणि निर्णायक लढाई लढायची आहे. १९८६ साली ते शिवसेनेत आले. दोन वेळा विधानसभा, एक वेळा विधानपरिषद, अशी सोळा वर्ष त्यांनी विधिमंडळात बीड चे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी [सर] यांनी, शिवसेनेचा आधुनिक “ज्ञानेश्वर” , असा प्रा. नवले यांचा गौरव केला होता.
तीन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची त्यांनी तयारी सुरू केली आहे. याच संदर्भाने,
त्यांच्याशी संवाद साधला. विविध विषयांवर चर्चा केली. एक साधा सुधा, शिकला सवरलेला सुसंस्कृत शिवसैनिक ते आमदार, मंत्री पदापर्यंतचा सोळा वर्षाचा काळ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने समाजकारणात तुटून पडणारा नेमका शिवसैनिक कसा उभा राहीला. तो सत्तासंघर्ष ,चढ उताराचा संघर्ष, खाचखळग्यांनी भरलेला होता.
१९९९ साली शिवसेनेत त्यांनी बंड केले. त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. त्यांनी अन्य पक्षात न जाता, अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने ते निवडणुक हारले. शरद पवारांचा पर्याय त्यांनी का निवडला नाही. असा प्रश्न उपस्थित होतो.
काँग्रेस मध्ये ते का रमले नाहीत. बीडच्या अनाकलनीय, विचित्र राजकीय पटलावर त्यांचा निभाव लागला नाही. हे वास्तव आहे. मात्र, त्यांना कसलीही खंत नाही.
वाणी विनायाक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा पहाडी आवाज, मराठी भाषेवरचे प्रभुत्व, शब्दावरची पकड त्यांच्या राजकी व्यक्तिमत्त्वाला आणखी खुलवते. शिवसेनेत त्यांनी बंड केले. त्यामुळेच, शिवसेनेने खा. नारायणराव राणे मुख्यमंत्री केले. नवले यांच्या नेतृत्वात
शिवसेनेत मोठे बंड होणार होते. मात्र, गणित चुकले. बंडातली माणसे शिवसेनेला जाऊन मिळाली. नसता, मुख्यमंत्रीपदावर गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री म्हणून प्रा. नवले, असा नवा राजकीय अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळाला असता. बातमी लीक झाली ,टायमिंग चुकले.
नारायण राणे यांनी नवलेंना काँग्रेस मध्ये आणले आणि थेट आमदार केले. सोळा वर्ष नवलेंना विधिमंडळात काम करायची संधी मिळाली. बीडच्या राजकारणात तडजोड करून, कुठे ही कुणाच्याही दारात उभे राहायचे, या चौकटीत ते बसले नाहीत. स्वाभीमान ठेवून त्यांनी राजकारण केले. त्यामुळेच, सकल मराठा समाजात त्यांची क्रेझ आहे.
प्रा. सुरेश नवले हे मुळ गेवराई [ जि.बीड ] येथील भूमिपुत्र आहेत. शिक्षणासाठी नवले कुटुंब बीडला आले. बीडच्या कबाड गल्लीत त्यांचे बालपण गेले. बलभीम महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करत असताना, त्यांचा शिवसेनेशी संबंध आला. सुरेश नवले यांनी १९८६ साली शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रीय कबड्डी पटू म्हणून त्यांची युवा वर्गाची प्रचंड क्रेझ होती. उत्तम संघटक कौशल्य, उच्च विद्याविभूषित असलेल्या नवले यांना शिवसेनेच्या माध्यमातून बीड मतदारसंघात जनाधार मिळाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाल्यावर त्यांनी शिवसेनेला बीड जिल्ह्य़ात उभे केले. २६ व्या वर्षी बलभीम महाविद्यालयाचा प्राध्यापक
आमदार झाला. काँग्रेस सरकारचा तो काळ होता. बीड शिवसेनेच्या शाखा होऊच नयेत म्हणून काळजी घेतली जायची. तत्कालीन मंत्री अशोकराव पाटील यांचा दबदबा होता. बीड जिल्ह्य़ातील जैतावाडी सारख्यागावखेड्यात नवले यांच्या उपस्थितीत शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली. त्याच दिवशी मंत्री अशोकराव पाटील यांची सभा झाली. भाषण करते वेळी त्यांना शिवसेनेची पाटी दिसतात,त्यांचा पारा चढला. त्यांनी पाटी उखडून फेकण्याचा आदेश दिला. काँग्रेस च्या लोकांनी पाटी उखडून फेकली. त्याच काळात मंत्री पाटील [१९८८ ] शासकीय विश्रामगृहात नागरीकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आले होते. प्रा. नवले यांच्यासह शिवसैनिक ही त्या बैठकीत बसले होते. नवले यांनी मंत्री महोदयांना, मला बोलू द्या. अशी विनंती केली. शिवसेनेची भूमिका मांडत असताना नवले म्हणाले, साहेब, तुम्ही मंत्री आहात. वैधानिक पदावर आहात. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याने नागरीकांना व्यक्ति स्वातंत्र्य दिले आहे. या अर्थाने, अभिव्यक्तीला तुम्ही कसे काय नाकरता ? शिवसेनेची पाटी तुम्ही फेकून दिली. हे आपल्याला शोभते का ? तुमचा आणि तुमच्या झुंडशाहीचा शिवसेना धिक्कार करून, तुमच्या तोंडावर आम्ही थुंकतो. निषेध करतो. प्रा. नवले यांनी तेवढे बोलून, मंत्री महोदयाच्या दिशेने ते थुंकले. तेवढ्यात, गोंधळ उडाला. पोलीसांनी शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला. नवले यांना डीवायएसपीने [ तत्कालीन ] धरून ठेवले. शिवसैनिकांना अटक झाली. प्रा. नवले यांच्यासह शिवसैनिक महिनाभर जेलमध्ये होते. त्या घटनेची मुद्रित माध्यमांनी [ वृत्तपत्रानी ] दखल घेतली. प्रा. सुरेश नवले मंत्र्याच्या तोंडावर थुंकले, अशी भलोमोठी हेडलाईन छापून आली. दीड वर्षांनी विधानसभेच्या निवडणुकी झाल्या. अवघ्या २६ वर्षाच्या सुरेश नवले यांना शिवसेनेने तिकिट दिले. राष्ट्रीय खेळाडू, शिवसेनेचा युवा चेहरा, उच्चविद्याविभूषित, डॅशिंग ,लोकप्रिय ठरलेले शिवसेनेचे उमेदवार सुरेश नवले यांना बीडच्या जनतेने आमदार केले. [ भाग – १ ]
सुभाष सुतार, पत्रकार – बीड