बीड,
राज्यस्तरीय कृषी महोत्सवात ईश्वरी फुल म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक नाव ”हेलीग्रिझम’ असणारे फुलांची माहिती जाणून घेण्यात बरेच शेतकरी उत्साही दिसले.
हेलिक्रिझम या फुलांना तडतडी फुल न सुकणारे फुल अथवा ईश्वरी फुल म्हणून ओळखले जाते. बीड जिल्ह्यातील पांगरी या गावात राहणारे प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिवाजी शिंदे हे या फुलांची शेती करतात. हेलीग्रिझम हे फुल प्लास्टिक सारखे दिसते. आणि वर्षभर या फुलांना काहीच होत नाही. या फुलांना पाण्यात बुडवल्यावर ते चिमतात आणि उन्हात ठेवल्यावर पुन्हा फुलतात हे या फुलाचे विशेषत्व आहे.
श्री शिंदे यांनी यांत्रिकी अभियंताची पदवी घेतली आहे. मात्र, त्यांना शेतीमध्ये विविध प्रयोग करायला आवडत असल्यामुळे ते प्रयोगशील शेतकरी म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत.
ईश्वरी फुल पर्यावरण पूरक असून वर्षभर फुल सुकत नाही. प्लास्टिकच्या फुलांना पर्याय म्हणून या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे श्री शिंदे यांनी बोलताना सांगितले.
त्यांनी 1 एकर मध्ये ईश्वरी फुलाची शेती केली असून अडीच महिन्यात फुलं उगवत असल्याचे त्यांनी सांगितले. या फुलांच्या शेतीमुळे त्यांनी सात ते आठ लाख कमावले आहेत.
ज्याप्रमाणे झेंडूची, शेवंतीच्या फुलांची शेती केली जाते त्याचप्रमाणे हेलिक्रिझम या फुलांचीही शेती केली जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या फुलांची शेती जास्तीत जास्त व्हावी यासाठी कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम सु शिंदे करीत आहेत यासह मंदिर देवालयाच्या समित्यांसोबतही त्यांचे समन्वय असून त्या ठिकाणी या फुलांचा हार चढवण्यात यावा असे ते पुजार्याना सांगत असतात.
शेतीला उद्योग समजून शिंदे नवनवीन प्रयोग शेतात राबवीत आहेत आणि इतर शेतकऱ्यांसमोर स्वतःचे उदाहरण निर्माण करीत आहेत.