आष्टी प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या एका खोलीत साने गुरुजी यांचे काही वर्ष वास्तव्य होते.त्याच महाविद्यालयात 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव असोदे.जळगाव पासून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे.बालकवी त्रिंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव येथे झाला.तिथल्या निसर्गरम्य वातावरणात औदुंबर सारख्या अनेक कविता बहरल्या.या शेताने लळा लावला म्हणणारे रानकवी ना.धों.महानोर यांच्या रानातल्या कविता,जैत रे जैत ची गाणी जगभर प्रसिद्ध.त्यांचे जन्मगाव अजिंठाच्या पायथ्याशी पळसखेडे.असं हे साहित्य वैभव लाभलेल्या परिसराला आष्टी,जि.बीड येथील कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,कवी हरिश हातवटे,कवी नागेश शेलार,कवी राजेंद्र लाड यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील वंशाजासोबत आठवणी जागवल्या.ना.धों.महानोर यांचे चिरंजीव डॉ.बाळासाहेब महानोर यांनी डॉक्टरी सेवेतून वेळात वेळ काढून दादांच्या कविता आणि पळसखेड आठवणींतून उभा केला.बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव यांच्या नातसून पद्माबाई पांडुरंग चौधरी यांनी भरपूर आठवणी सांगितल्या.आजही बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातील जाते,खुरपे,चपला,पेटी,अशा अनेक वस्तू जतन केलेल्या आहेत.बालकवी ठोंबरे यांच्या घरात राहणारे उदय योगेंद्र डहाळे यांनी आमचे स्वागतच केले.विशेष म्हणजे बहिणाबाई चौधरी यांचे घर सरोदे या कुटुंबांना विकण्यात आले आहे.तर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे घर डहाळे यांना विकण्यात आले आहे.बालकवींच्या घरात कवी सय्यद अल्लाउद्दीन यांनी औदुंबर ही कविता गाऊन म्हटली.तसेच ज्या औदुंबर वृक्षावरून बालकवींना कविता सुचली तिथला डोह प्रत्यक्ष पाहिला.तो वृक्ष आज नसल्याची हुरहुर लागून राहिली.शेत सपाटीकरणाच्या योजनेतून त्यांचा काळा डोह शेवटची घटका मोजत आहे.काहींच्या नावाने भले विद्यापीठे स्थापन झाले असले तरी,त्यांच्या जन्मस्थळाकडे सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे जाणवले.