मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा – अमरसिंह पंडित

0
294

गेवराई, (प्रतिनिधी)

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश होवूनही केवळ नगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावापोटी शासन पाणी सोडण्यासाठी विलंब करत आहे. कायद्यातील तरतुदीनुसार समन्यायी पध्दतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीच्यावतीने सोमवार, दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर भव्य जनआंदोलन करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, संघटना, शेतकरी या आंदोलनात सहभागी होत आहेत. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सातत्याने मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा दिलेला आहे. आमदार असताना सभागृहात आणि सुप्रिम कोर्टापर्यंतच्या कायदेशीर लढाईत सुध्दा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मराठवाड्यातील बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर यांसह मध्य गोदावरी खोऱ्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणात ४० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचन व औद्योगिक पाणी वापर लक्षात घेता भविष्यकालीन वापरासाठी हा पाणीसाठा अपुरा ठरणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यातील तरतुदीनुसार दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांच्या पाणी साठ्याचा आढावा घेवून समन्यायी तत्वावर सर्व धरणाची पाण्याची टक्केवारी सारखी राहिल या पध्दतीने पाण्याचे नियमन करण्याची तरतुद कायद्यात आहे. शासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेवूनही केवळ अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी शासनावर दबाव निर्माण केल्यामुळे त्याची अंमलबजावणी होवू शकली नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे असे प्रतिपादन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले आहे.
अमरसिंह पंडित यांनी वेळोवेळी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संधी मिळेल तेथे आवाज उठविला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून या बाबत सातत्याने चर्चा घडवून आणली होती. जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणांमधून जायकवाडीमध्ये पाणी सोडावे या मागणीसाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आले असून आजी-माजी आमदार, विविध संस्थांचे प्रतिनिधी, संघटनेंचे प्रतिनिधी यांसह शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर सोमवार, दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य जनआंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला गेवराई विधानसभा मतदार संघातील विशेषतः जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले आहे. यावेळी जय भवानीचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, संचालक नंदकिशोर गोर्डे, संचालक नारायण नवले, माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, फुलचंद बोरकर, माजी उप सभापती डॉ.आसाराम मराठे, सरपंच राहुल जाधव, अरुण तौर, सिध्देश्वर काळे, राधाकिसन चक्कर, अनिरुद्र तौर, अण्णासाहेब तौर, सुभाष मस्के, संचालक शंकरबप्पा तौर, चंद्रकांत पंडित, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जाधव, हनुमान कोकणे, रामलाल धस, परिक्षीत जाधव, रावसाहेब काळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here