लातूर प्रतिनिधी :श्रीकांत चलवाड
- लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील आंबा हनुमानाच्या पाठीमागे असलेल्या रेणूकानगरात आईला मारहाण करीत असलेल्या बापाच्या पोटात चाकू खूपसून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लातूर शहरातील रेणूकनगरात सोमनाथ मधुकर क्षीरसागर वय ४८ वर्षे यांचे कुटुंब दिनू जानकर यांच्याकडे किरायाने राहते. ३ जूनच्या रात्री साडे नऊ च्या सुमारास सोमनाथ क्षीरसागर व त्याची पत्नी मंगल क्षीरसागर यांच्या भांडण सुरू झाले. सोमनाथ आपल्या पत्नीला मारहाण करीत होता. हे त्याचा मुलगा रोहित सोमनाथ क्षीरसागर वय २३ वर्षे याला बाप आपल्या आईला मारहाण करून त्रास देतोय हे सहन न झाल्याने रोहितने घरातील चाकू काढून बापाच्या पोटात व छातीवर चाकूने सपासप वार केले. यात सोमनाथ यांचा मृत्यू झाला. मयत
सोमनाथ यांची पत्नी मंगल क्षीरसागर हिने दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रोहित क्षीरसागर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरक्षक अतुल डाके हे करीत आहेत