महिला आंदोलनकर्त्यांचाही मोठा सहभाग
गेवराई ( प्रतिनिधी ) सन 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यातल्या विविध विभागातील संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात, गेवराई तालुक्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. दिनांक 14 मार्च रोजी गेवराई तहसीलवर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चा काढला. यात महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला. पहिल्याच दिवशी संपामुळे आरोग्य, शिक्षण, आणि महसूल यंत्रणासह अनेक विभागातील यंत्रणा कोलमडल्याचे दिसले.
जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी या मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामध्ये गेवराई तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आरोग्य शिक्षण महसूल यासह विविध विभागात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या तब्बल ती संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात उतरले आहेत दिनांक 14 मार्च रोजी गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात या सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित झाले होते. पंचायत समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक मार्गे तहसील कार्यालयावर या शेकडो कर्मचाऱ्यांचा पायी मोर्चा धडकला. यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी “एकच मिशन जुनी पेन्शन”, “पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची”, “तुम्हाला पेन्शन आम्हाला टेन्शन चालणार नाही”, “कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा गगनभेदी घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांनी आपल्या डोक्यावर एकच मिशन जुनी पेन्शन असे लिहिलेल्या टोप्या घालून मोर्चात सहभाग घेतला. तहसील कार्यालयात सर्व आंदोलनकर्त्यांच्या वतीने गेवराई तालुका समन्वय समितीचे सदस्य तथा मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी प्रशासनासमोर बाजू मांडताना म्हटले की, जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. कर्मचारी राज्य शासनाच्या विरोधात नाहीत, परंतु आमच्या हक्काच्या मागणीसाठी लढणे हा आमचा अधिकार आहे. जोपर्यंत राज्य सरकार सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे ठणकावून सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी “एकच मिशन जुनी पेन्शन” म्हणत प्रचंड घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदार सचिन खाडे म्हणाले की, आपली मागणी शासनापर्यंत कळवली जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची जुनी पेन्शन योजना शासन लवकर लागू करेल अशी अपेक्षा करून, त्यांनी लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या.
या मोर्चात मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिनकर शिंदे, जितेंद्र दहिफळे (तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना), नगरपरिषद कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड, अर्जुन बारगजे ( तालुकाध्यक्ष ग्रेड मुख्याध्यापक संघटना ), ए टी चव्हाण ( तालुकाध्यक्ष केंद्रप्रमुख संघटना ), रमेश हुलगे ( तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना ), अशोक डरफे (तालुका अध्यक्ष तलाठी व मंडल अधिकारी संघटना ), विष्णू जवंजाळ (आरोग्य संघटना ), सुरेश बारगजे ( प्रशासनाधिकारी पंचायत समिती गेवराई ), अंकुश राठोड ( तालुकाध्यक्ष पंचायत समिती कर्मचारी संघटना ), बाळासाहेब गावडे ( तालुकाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना ), कैलास पट्टे (तालुकाध्यक्ष शिक्षक भारती संघटना), गणेश सुळे (तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ), विशाल कुलकर्णी ( तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ), कैलास चव्हाण ( तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श प्राथमिक शिक्षक समिती ), दयावान कुटे ( तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद ), अशोक राठोड (तालुका अध्यक्ष आश्रम शाळा कर्मचारी संघटना), अमोल आतकरे (तालुका अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संघटना), चोपडे सर (बांधकाम विभाग पंचायत समिती गेवराई), आघाव साहेब (विस्तार अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प पंचायत समिती ) आदींसह वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या शेकडो प्रमुख पदाधिकारी, कर्मचारी व महिला सदस्य बहुसंख्येने सहभागी झाले होते.